विवाह समारंभ झालेत प्रतिष्ठेचे लक्षण

पेठ – ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विवाहासाठी खर्च केला जातो. प्रत्येक गोष्टीचे अनुकरण केले जाते. त्यामध्ये डीजे, लग्नपत्रिका, मानपान, जेवणावळी, फटाक्‍यांची आतषबाजी, वरात असेल अशा गोष्टींवर थोडासा विचार झाला पाहिजे. आजच्या दुष्काळी परिस्थितीत ही एवढा अमाप खर्च केला जातो. प्रत्येकाने वैयक्तिकरीत्या यावर विचार केला पाहिजे.

पहिली गोष्ट म्हणजे डीजे, सकाळची मिरवणूक असो की दुपारची. त्यात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. तसेच वयस्कर दवाखान्यातील रूग्णांना, माणसांना देखील त्या आवाजाचा त्रास सहन करावा लागतो. दुसरी एक वेगळीच प्रथा रूजू होताना दिसते ती म्हणजे गाड्यांच्या प्रचंड ताफा, एकापाठोपाठ एक अशा या गाड्यांची मिरवणूक काढली जाते. तिसरी गोष्ट म्हणजे लग्नपत्रिका यामध्ये देखील नेते, पदाधिकारी यांची नावे टाकली जातात पण काही वेळेस तर हे लोक उपस्थित देखील राहत नाही. मग हा खर्च आणि ही भरमसाठ नावे यावर विचार केला पाहिजे. चौथी गोष्ट मानपान, यावर देखील मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. फेटे, रूमाल किंवा आहेरांच्या साड्या असतील या गोष्टी अफाट खर्च केला जातो. खरं तर हा अनावश्‍यक खर्च टाळून एखाद्या सेवाभावी संस्थेला किंवा अनाथाश्रमाला हा निधी देऊ केला तर त्यांना थोडा हातभार लागेल.

लग्नाला टिळ्यासाठी वापरण्यात येणारे कुंकू हे धुतले तरी जात नाही. खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये भेसळ असते. शिल्लक राहिलेल्या जेवणावळीवर विचार झाला पाहिजे. एकीकडे पोटची भूक भागविण्यासाठी भटकणारा समाज आणि एकीकडे कार्य आहे म्हणून वाया जाणारे अन्न. अन्न हे पूर्णब्रम्ह मानणारे आपण यावर नक्कीच विचार झाला पाहिजे.

अनावश्‍यक खर्चावर आळा बसावा
फटाक्‍यांची होणारी आतषबाजी त्यामुळे होणारे ध्वनीप्रदूषण, वायू प्रदूषण यावर होणारा अनावश्‍यक खर्च याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. तसेच, लग्नसमारंभात पुढारी मंडळींची भाषणांसाठी होणारी चढाओढ, त्यामुळे चुकलेला लग्नाचा मुहूर्त या गोष्टी टाळल्या पाहिजेत. वरातीवर होणारा वारेमाप खर्च त्यावर थिरकणारी आजची तरूणाई अशा गोष्टी बाजूला सारून एक नवी आणि वेगळी विवाह संकल्पना राबवण्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ही सध्याची काळाची गरज आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.