श्रीगोंदा – तालुक्यातील इनामगाव ते ढोकराई रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्याच्या कामाची मागणी केली जात होती. काही तांत्रिक अडचणी असल्याने मंजुरीला वेळ गेला, मात्र आता या रस्त्यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून १७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली.
नागवडे यांनी म्हटले आहे की, इनामगाव-वांगदरी-ढोकराई या रस्त्याचा नऊ किलोमीटरचा टप्पा जास्त खराब झाल्याने अधिक निधीची आवश्यकता होती. त्यानुसार आ. बबनराव पाचपुते यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू होता. मात्र, काही तांत्रिक अडचणी असल्याने मंजुरी मिळण्यास विलंब झाला. अखेर मंगळवारी (दि.३१) इनामगाव ते ढोकराई या रस्त्यासाठी १७ कोटींच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी खा. सुजय विखे आणि आ. बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून वांगदरीतील पाणीयोजनेसाठी १७ कोटी ६४ लाख निधी, अन्य कामांसाठी १ कोटी ८८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, श्रीगोंदा कारखाना ते इनामगाव रस्त्यासाठी लवकरच निधी मंजूर होणार असल्याची माहिती नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दैनिक ‘प्रभात’ला दिली होती. तर आ. बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी १७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याच्या ‘पोस्ट’ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यातून आ. पाचपुते आणि नागवडे गटामध्ये जोरदार श्रेयवाद रंगल्याचे पाहायला मिळाले.
ज्यांनी आजपर्यंत वांगदरीत एक रुपयाचा निधी आणला नाही, त्यांनी १७ कोटींच्या निधीचे श्रेय घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्यांनी आधी ग्रामपंचायतींना निधी आणून दाखवावा.
– संदीप नागवडे
विरोधकांनी रस्त्याचा १७ कोटींचा निधी कोणत्या योजनेतून आणला एवढे सांगितले तरी त्यांचे जाहीर आभार मानू. वांगदरीतील घरकुलांसाठीही त्यांचे योगदान काय हेही सांगावे.
– प्रताप पाचपुते