नगर – महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या सूचनेनुसार नगर जिल्हा अध्यक्ष पदासाठी तब्बल 16 इच्छुकांनी प्रत्यक्ष मुलाखत दिली असल्याने अध्यक्षपदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली असल्याने निवड समितीला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. 10 जानेवारीनंतर प्रदेश पातळीवरून या निवडी जाहीर होणार आहेत.यावेळी निवडणुक न घेता मुलाखती घेवून या निवडणुका घेतल्या जात आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून रिक्त असलेल्या, युवक कॉंग्रेसच्या नगर जिल्हाध्यक्ष पदाच्या मुलाखती लालटाकी येथील कार्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या. निरीक्षक म्हणून निवड समिती सदस्य व प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस सुमित भोसले, अभय देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये पार पडल्या. यावेळी कॉंग्रेस शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, जिल्हा युवक कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मयूर पाटोळे, मुबीन शेख,योगेश काळे, हारून इनामदार, फिरोज शेख, चंद्रकांत क्षीरसागर आदींनी त्यांचे स्वागत केले.
जिल्हाध्यक्ष पदासाठी स्मितल वाबळे (श्रीगोंदा), ऋषिकेश मुळे (कर्जत), शरद निरंजन पवार (श्रीरामपूर), मोहसीन शेख (नगर शहर), राजू बोरुडे (राहुरी), संदीप दरंदले (नेवासा), प्रसाद शेळके (शिर्डी), श्रीकांत दंडवते (राहाता), राहुल उगले (जामखेड), सचिन रणदिवे( श्रीरामपूर ) सिद्धेश खिलारी ,योगेश शिंदे(पारनेर), मंगल भुजबळ (नगर शहर), कृष्णा शेळके (कर्जत), तुषार पोटे (कोपरगाव), संचित गिरमे (श्रीरामपूर),ऍड अक्षय कुलट (नगर तालुका) यांच्यासह इतर दहा ते बारा इच्छुकांनी निरीक्षकांशी संपर्क करून इच्छा व्यक्त केली असल्याने अध्यक्ष निवडतांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
दरम्यान, निवड समिती सदस्य हे राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ. डॉ सुधीर तांबे, आ.लहू कानडे यांची भेट घेणार असून स्थानिक नेत्यांशी इच्छुकांबाबत चर्चा करून अध्यक्ष पदाबाबतचा सविस्तर अहवाल प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना सादर करणार असल्याने इच्छुकांची निवड प्रदेश कार्यालया मार्फत घोषित होईल.