आमदार भरणेंच्या आदेशाला केराची टोपली : प्रसूतीसाठी रात्री आलेल्या महिलेला चुकीची वागणूक
रेडा – इंदापूर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांना सेवा मिळत नाहीत, अशा शेकडो तक्रारी पुणे, मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाकडे गेल्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांना यासंदर्भात समस्या आढावा बैठक घ्यावी लागली होती. कारभार सुधारण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
मात्र, याच शहरात व उपजिल्हा रुग्णालयाच्या हाकेच्या अंतरावर खासगी दवाखाने थाटलेल्या परंतु रुग्णालयाच्या सेवेमध्ये असणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना खासगी दवाखाना चालवण्यासाठी जुजबी उपचार करून रुग्ण घरी घालवणे, रात्री आलेल्या गरीब कुटुंबातील महिलांना प्रसूतीसाठी आणखी काही दिवसांचा अवधी आहे, असे कारण दाखवत घरी घालवणे, असा प्रकार सुरू आहे. स्त्री रोग तज्ज्ञ शहरातील असताना मनमानी करीत असल्यामुळे आमदारांनी केलेल्या सूचना फोल ठरल्या आहेत.
इंदापूर शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे. गोरगरीब रुग्णांना सेवा घेण्यासाठी नाहक त्रास सोसावा लागत आहे. मागील आठवड्यात वडापुरी येथील महिला डिलिव्हरीसाठी सातच्या दरम्यान आली होती. मात्र, याठिकाणी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना रुग्णांच्या नातेवाईकांनी भ्रमणध्वनी केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना का संपर्क साधला, हाच राग मनात धरून त्या रुग्णाला जुजबी तपासून घरी पाठवण्यात आले.
मात्र, रात्री प्रसूतीच्या कळा येऊ लागल्यामुळे शहरातील खासगी दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले. खासगी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर असताना देखील त्यांनी या महिलेची नॉर्मल प्रसूती केली. परंतु या गरीब कुटुंबांना खासगी दवाखान्यात पैसे मोजावे लागले. हाच उपचार उपजिल्हा रुग्णालयात झाला असता तर महिलेचे पैसे वाचले असते.
एक स्त्री रोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी मी कोषागार अधिकाऱ्याचा मुलगा आहे. इंदापुरमध्ये शिक्षण झाले आहे. इंदापूरचा आहे, असे एका महिलेच्या नातेवाईकांना रागाने बोलत रुग्ण महिलेला घरी पाठवले. त्यामुळे अरेरावी करणाऱ्या व रुग्णालयाशेजारीच खासगी दवाखाने थाटून बसलेल्या डॉक्टरांची तालुक्याच्या बाहेर तात्काळ बदली करा, अशी मागणी नागरिकांची व रुग्णांची आहे. उपजिल्हा रुग्णालयांमध्ये प्रसूतीचे प्रमाण जादा होत आहे.
तरी देखील बालकांवर उपचार याठिकाणी परिपूर्ण केले जात नाहीत. बाळाला कावीळ झाली आहे. बाळाला सोलापूरला किंवा पुणे येथे ससूनला न्यावे लागेल; अन्यथा आमच्या दवाखान्यामध्ये काचेत ठेवावे लागेल, असे बाल रोग तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. त्यामुळे नाईलाजास्तव जन्मलेली बालके खासगी दवाखान्यात भरती करतात. याच बालकांच्या उपचारापोटी 10 ते 15 हजार रुपये बिल घेतले जाते. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय असताना लहान बालकांवर खासगी दवाखान्यात उपचार कशासाठी, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
पुणे येथील जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नांदापुरकर, आरोग्य उपसंचालक संजय देशमुख यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्या. आमदार दत्तात्रय भरणे यांनी काशीला जाण्यापेक्षा रुग्णांची सेवा करा, असे डोस पाजले. परंतु काहीही फरक पडलेला दिसत नाही. यासाठी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये काम करणारे तालुक्यातील डॉक्टर हे तालुक्याच्या बाहेर पाठवावेत तरच हे उपजिल्हा रुग्णालय सुस्थितीत चालेल व रुग्णांना सेवा मिळेल, असे बोलले जात आहे.
बघा, तुमच्या आमदारांना सांगा
यासंदर्भात इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हे डॉक्टर इंदापूर तालुक्यातील व शहरातील असल्यामुळे आम्ही सांगितलेल्या सूचनांचे पालन करीत नाहीत. बघा, तुम्ही आमदारांना सांगा, अशीही माहिती मोरे यांनी दिली.
तर प्रसूती रुग्णालयात करावायची होती – पासगे
यासंदर्भात माहिती देताना रुग्ण महिला काजल पासगे म्हणाल्या की, माझ्या आईच्या घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे मला प्रसूती इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात करायची होती. मला वेदना जाणवू लागल्याने माझे भाऊ व नातलग यांच्यासमवेत गेलो.
परंतू स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांनी आणखी पाच ते सहा दिवस वेळ आहे. तुम्ही घरी जावा, असे सांगितले. तुमच्या भावाने आमच्या साहेबांना का फोन केला, असे डॉक्टर म्हणत होते. मला होणारा त्रास मी सांगितला होता. तरी देखील संबंधित डॉक्टर यांनी उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट करून घेतले नाही.
याचदिवशी मी माझ्या आईच्या गावी रात्री आल्यानंतर त्रास सहन करावा लागला. खासगी दवाखान्यात गेलो. माझी प्रसूती झाली. त्यामुळे माझ्या नातेवाईकांना कर्ज काढून प्रसूती करावी लागली आहे.