पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाने हाहाकार उडविला असून आज शहरातील बाधितांच्या संख्येज पुन्हा मोठी भर पडली. आज दिवसभरात तब्बल 154 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला आहे. आजच्या बाधितांमध्ये शहरातील 143 जणांचा तर शहराबाहेरील 11 जणांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 2405 वर पोहोचली असून मृतांची संख्या 68 वर पोहोचली आहे.
शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार शहरातील 143 जणांना तर शहराबाहेरील 11 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. शहरातील बाधितांमध्ये 81 पुरुषांचा आणि 62 महिलांचा समावेश आहे. शहराबाहेरील रुग्णांमध्ये 6 पुरुषांचा आणि 5 महिलांचा समावेश आहे. आजचे बाधित रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. तर शहराबाहेरील रुग्ण हे येरवडा पुणे, कल्याणीनगर, कोथरुड, धुळे येथील रहिवाशी आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये शहरातील दोघांचा तर बाहेरील एकाचा समावेश आहे. शहरातील बोपखेल येथील 65 वर्षीय स्त्री आणि रमाबाईनगर, पिंपरी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. तर सिंहगड रोड, पुणे येथील 75 वर्षीय महिलेवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मयतांची संख्या 41 वर तर शहराबाहेरील मयतांची संख्या 27 वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरातील 1443 शहराबाहेरील 150 जण करोनामुक्त झालीे आहे. आज दिवसभराते 117 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आकड्यांची पुन्हा लपवाछपवी
महापालिकेच्या प्रेसनोटची माहिती आणि डॅशबोर्डवरील माहितीमध्ये सातत्याने तफावत दिसून येत आहे. पाच वाजेपर्यंत प्रेसनोटमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार 143 जणांना बाधा होऊन आकडा 2405 वर पोहोचल्याचे म्हटले आहे. तर याच वेळी शहरातील बाधितांचा आकडा 2450 इतका डॅशबोर्डवर दाखविण्यात आला आहे. डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार चारजणांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. तर प्रेसनोटनुसार तिघांचाच मृत्यू झाल्याचे महापालिकेने म्हटले आहे.