तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची माहिती
वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील 15 हजार परप्रांतीय त्यांच्या स्वगृही परतणार आहे. प्रथम त्या मजुरांची आरोग्य तपासणी करून त्या राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेऊनच त्यांना मावळातून स्वगृही जाण्यासाठी परवानगी पास देण्यात येणार आहे, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.
मावळ तालुक्यातील 15 हजार परप्रांतीय मजूरांना त्यांच्या स्वगृही पाठवण्याची जबाबदारी असून, त्यातच महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बांधकाम व उद्योग सुरू करण्याची परवानगी दिल्याने ज्यांनी गावी जाण्याची परवानगी मागितली त्यापैकी काही मजूर स्वगृही जाणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने अनेक परप्रांतीय मजूर व त्यांची कुटुंब अडकून पडली होती. 22 मार्चपासून हाताचे काम बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. शासन व सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला. शेवटी ज्यांना गावी जायचे आहे अशांना महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली. त्या अगोदर मावळ तालुक्यातील नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत आदींना परप्रांतीय मजूर कुटुंबाची नोंदणी करून घेण्यात आली.
आतापर्यंत 15 हजार परप्रांतीय मजूर कुटुंबाची नोंद झाली आहे. त्यांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली असून, तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ज्या राज्यातील मजूर कुटुंब आहे. त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीनंतर त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार बर्गे यांनी दिली.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वगृही परतण्याची परवानगी मिळाल्याने परप्रांतीय मजूर कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.