जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात 15 कोटींचे निव्वळ व्याज

लेखा विभागाची कामगिरी; सव्वाचार कोटी रुपयांचे अधिकचे उत्पन्न


इतर विभाग बोध घेणार ?

आर्थिक लेखाजोखा ठेवण्याचे काम करणाऱ्या लेखा विभागाने अर्थसंकल्पाच्या उत्पन्नाच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले. मात्र, उर्वरित विभागातून उत्पन्नासाठी जेवढे प्रयत्न होणे अपेक्षित आहे तेवढे प्रयत्न होताना दिसून येत नाही. विशेषत: जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अनेक मोकळ्या जागा, इमारती व गाळे वापराविना पडून आहेत. त्याचबरोबर कृषी विभागातून देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. त्यासाठी नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. भागवत कितपत प्रयत्न करतात, हे येत्या काळात पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


सातारा –
जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पाने प्रथमच 100 कोटींचा टप्पा गाठताना इतर विभागांतून फारसे स्वउत्पन्न प्राप्त झाले नसले तरी लेखा विभागाने केलेल्या विशेष कामगिरीने यंदाच्या अर्थसंकल्पासाठी अनुदानाच्या रकमेवर 15 कोटी रुपयांचे निव्वळ व्याज प्राप्त झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल सव्वाचार कोटी रुपयांचे अधिकचे व्याज या वर्षी प्राप्त झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात उत्पन्नामध्ये सर्वाधिक उत्पन्न स्थानिक उपकरातून 34 कोटी रूपये इतके प्राप्त झाले आहे. त्यापाठोपाठ बॅंकांमधील ठेवींवर मिळणाऱ्याचे व्याजाचे उत्पन्न सर्वाधिक आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या योजनांसाठी मिळणारे अनुदान आणि कराची रक्कम बॅंकेत ठेव स्वरूपात ठेवल्यामुळे यावर्षी तब्बल 15 कोटी 53 लाख 98 हजार रूपये इतके व्याज प्राप्त झाले आहे. 2016-17 मध्ये 12 लाख 51 हजार रूपये तर 2017-18 मध्ये 11 लाख 40 लाख रूपये इतके व्याज प्राप्त झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत व्याजाच्या रकमेत तब्बल सव्वाचार कोटी रूपंयाची वाढ झाली आहे.

साहजिकच एवढ्या मोठ्या रकमेमुळे जिल्हा परिषदेच्या विकास कामांना गती मिळणार आहे. दरम्यान, यंदाच्या वर्षी व्याजाची रकमेत वाढ करण्यासाठी लेखा विभागाने एप्रिल 2018 पासून सुरूवात केली होती. मुख्य लेखाधिकारी धर्मेंद्र काळोखे यांच्या संकल्पनेतून लेखा विभागाने विकासकामांना आवश्‍यक एवढाच निधी कॅशबुक शिल्लक ठेवला होता. उर्वरित निधी ठेव स्वरूपात सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत वर्ग केला होता. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम यंदाच्या अर्थसंकल्पात दिसून आला असल्याचे सहाय्यक लेखाधिकारी टी. एन.सावंत यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.