जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा आज काळा दिवस

राजेंद्र चोरगे यांची माहिती; आरटीई कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांचे शुल्क मिळण्यासाठी लक्ष वेधणार
सातारा – महाराष्ट्राबरोबर सातारा जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा गुरुवारी दि. 18 जुलै रोजी काळा दिवस पाळणार आहे, असे इन्डिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे सातारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी सांगितले.

राज्य शासनाने आरटीई कायद्याअंतर्गत आर्थिक दुर्बल व आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी योजना 2012-13 मध्ये सुरु केली होती. ही योजना चांगली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क राज्य शासन देत असते. परंतु, 2012 ते 2016 पर्यंत या शुल्काची पूर्तता शासनाने केली असून 2017-18, 2018-19 व 2019-20 या आर्थिक वर्षांचे शुल्क अद्यापपर्यंत शासनाने दिले नाहीत.

राज्यात आरटीई योजनेअंतर्गत एक लाख 75 हजार विद्यार्थी तर सातारा जिल्ह्यामध्ये 230 शाळांमधून आठ हजार विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. फक्‍त सातारा जिल्हयामध्ये 2017-18 चे अंदाजे शैक्षणिक शुल्क पाच कोटी रूपये, 2018-19 मध्ये सात कोटी आणि चालू शैक्षणिक वर्षात नऊ कोटी रूपये असे एकूण सुमारे 21 कोटी रूपये या शैक्षणिक वर्षाअखेर सर्व शाळांना मिळणे जरूरीचे आहे, शी माहिती श्री. चोरगे यांनी दिली.

जिल्ह्यातील 230 शाळांनी 2018-19 पर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांकडे याबाबतचे प्रस्ताव सादर केले आहेत. शासनाने 2018-19 मध्येच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे या योजनेसाठी साडेतीन कोटी रूपये इतका निधी जमा केला असून शिक्षणाधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे शासनाकडून वेळेत आलेला निधीसुद्धा जिल्हयातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शासनाच्या धोरणानुसार 50 टक्के निधीसुध्दा 2017-18 या वर्षातील शैक्षणिक शुल्क शिक्षणाधिकारी देत नाहीत ही दुर्देवी बाब आहे, असे त्यांनी सांगितले.

दरवर्षी आरटीई योजनेअंतर्गत वाढत असलेली विद्यार्थी संख्या व त्यांच्या शैक्षणिक शुल्काची रक्‍कम कोट्यवधी रुपयांमध्ये जात असून याचा संपूर्ण बोजा कायमस्वरुपी विना अनुदानित शिक्षण संस्थांवर पडत आहे. यापुढेही असेच चालू राहिले तर सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद कराव्या लागतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

आरटीई अंतर्गत सन 2018-19 पर्यंतचे थकित शुल्क परतावा त्वरीत अदा करावा, राज्यात एक मूल्यमापन पध्दत लागू करून दहावींच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून पूर्ववत करावे, तसेच शैक्षणिक संस्थांवर वाढत असलेले हल्ले लक्षात घेऊन शाळा सुरक्षा कायदा लागू करावा, अशा मागण्या इन्डिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष राजेंद्र दायमा व कार्याध्यक्ष राजेंद्रसिंह यांच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हयातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळा गुरुवारी दि.18 जुलै रोजी काळा दिवस पाळणार असून या दिवशी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. विद्यार्थी वाहतूक करीत असलेल्या व्हॅन, रिक्षा व बसेससुध्दा काळे झेंडे लावून निषेध व्यक्‍त करणार आहेत. यामध्ये सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालविणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन इन्डिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, संचालक अमित कुलकर्णी, दिलीप वेल्लीवट्टी जिल्हा कार्याध्यक्ष मनिंद्र कारंडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.