फिरोजाबाद : उत्तरप्रदेशात बुधवारी रात्री आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला एका खासगी बसने जोरदार धडक दिली. त्या भीषण अपघातात 14 प्रवासी मृत्युमुखी पडले, तर 25 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयांत दाखल करण्यात आले.
त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त डबल डेकर बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते. ती बस दिल्लीहून बिहारमधील मोतिहारीकडे निघाली होती. त्यातील सर्व प्रवासी बिहारचे रहिवासी असल्याचे समजते.
अपघातात ट्रक चालक आणि क्लिनरही जखमी झाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अपघातातील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले.