संस्कृतिच्या खुणा: गजराज

अरूण गोखले

आपल्या संस्कृतीने ज्या भाग्यवान प्राणिमात्रांना वंदनीय आणि पूजनीय मानले त्यातलाच आणखी एक भाग्यवान प्राणी म्हणजेच हत्ती. ह्यालाच संस्कृत भाषेत गज असे म्हटले जाते. हत्ती हा सर्व अबालवृद्धांना प्रिय असणारा प्राणी आहे. तो आपल्या पुरातन संस्कृतीइतकाच पुरातन असून त्यास स्वर्गलोक, इंद्रलोक आणि भूलोक अशा तिन्ही ठिकाणी मानाचे स्थान आहे.

ऐरावत नावाचा हत्ती हा सागरमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक रत्न असे मानले जाते. देवदेवतांनी हा ऐरावत हत्ती देवांचा राजा इंद्र ह्यास अर्पण केला. पुढे इंद्राने त्याचा आपले वाहन म्हणून स्वीकार केला असा पौराणिक कथांचा आधार आहे.

हत्ती हा देहाने स्थूल, त्याचे कान हे सुपासारखे, सोंड लांब, त्याला मोठे सुळ्यासारखे दात आणि त्याच्या आकारमानाच्या तुलनेत फार लहान असे डोळे आणि तशीच छोटी शेपूट. असा हा प्राणी सर्व प्राण्यांमधला बलवान आणि बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. त्याचे बारीक डोळे चिकित्सक विचार नजर आणि सूक्ष्मपरीक्षण क्षमता दर्शविते. हा प्राणी पूर्णत: शाकाहारी असून तो गवत, फळे, पाने खातो.

हत्ती हा दिसायला सुंदर असल्यानेच अनेक सांस्कृतिक कलांमध्ये ह्याचा समावेश करून घेतल्याचे लक्षात येते. हत्ती आणि पाऊस यांचा जवळचा संबंध सांगितला जातो. त्यास पाण्यात डुंबायला अतिशय आवडते. हत्ती लक्ष्मीस अतिप्रिय आहे. कमळात बसलेली लक्ष्मी आणि तिला आपल्या सोंडेतील जलकुंभातील पाण्याने स्नान घालणारे तिच्या मागचे दोन हत्ती असे चित्र, शिल्प, आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. श्री महालक्ष्मीच्या अष्टरूपांपैकी असे हे देवीचे एक रूप म्हणजे गजलक्ष्मी किंवा गजांतलक्ष्मी या नावांनी ओळखली जाते.

हत्ती या प्राण्यास जशी देवदेवता ह्याच्याकडे मान्यता तसेच राजद्वारीही त्याचा मान आहे. दारी झुलणारा हत्ती ही एक वैभवाची निशाणी मानली जाते. मंदिरांच्या बांधकामात, शिल्प उभारणीत, चित्रात, शिल्पात, लेण्यात, राजमुद्रेवर आणि आजकालच्या कागदी चलनी नोटेवरही आपल्याला आवर्जून हत्ती पाहायला मिळतो. इतकेच नव्हे तर अनेक धातूंच्या वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने, लाकडी वस्तू, भरजरी वस्त्रे, दिवाणखाने, हॉल ह्यातील प्रदर्शनीय वस्तूंमध्येही मानाचे स्थान हत्ती राखून आहे या हत्तीच्या मुखानेच शिवपार्वतीचा पुत्र गणेश हा गजानन या नावाने प्रसिद्ध झाला हे तर आपण सर्वजण चांगलेच जाणतो.

Leave A Reply

Your email address will not be published.