कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी 23 उमेदवारांनी 32 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत 22 उमेदवारी अर्ज राहिले होते. अर्ज माघारीच्या दिवशी 8 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशिब आजमावित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आमदार स्नेहलता कोल्हे (भाजप), आशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), राजेश परजणे (अपक्ष), तर नगराध्यक्ष विजय वहाडणे (अपक्ष) यांच्या लढतीकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीतर्फे अशोक विजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाचा एबी फॉर्म न जोडल्याने त्यांचा पक्षाचा अर्ज अवैध ठरवल्याने त्यांना अपक्ष उमेदवारी करावी लागणार आहे. आज अर्ज माघारीच्या वेळी 22 उमेदवारांपैकी 8 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने 14 उमेदवार रिंगणात आहेत.
उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्यांची नावे पुढील प्रमाणे ः ज्ञानदेव देवराम आगवण (अपक्ष), नारायण माधवराव आढाव (अपक्ष), नानासाहेब मुरलीधर आभाळे (अपक्ष), प्रभाकर सीताराम आव्हाड (अपक्ष), अल्लाउद्दीन समशूभाई खाटिक (अपक्ष), रावसाहेब चांगदेव टेके (अपक्ष), दिलीपराव मारुतीराव तिडके (अपक्ष), शरद लक्ष्मण लोंढे (अपक्ष) यांचा सामावेश आहे.
आशुतोष अशोकराव काळे (नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी), स्नेहलता बिपीनदादा कोल्हे (भाजप), माधव सखाराम त्रिभुवन (बहुजन समाज पार्टी), शिवाजी पोपटराव कवडे (बळीराजा पार्टी), शीतल दिगंबर कोल्हे (हिंदुस्थान जनता पार्टी), अशोक विजय गायकवाड (अपक्ष), मगन पांडुरंग आहिरे (अपक्ष), सुदाम पंढरीनाथ उकिरडे (अपक्ष), अशोक नामदेव काळे (अपक्ष), राजेश सखाहरी परजणे (अपक्ष), राजेश नामदेवराव परजणे (अपक्ष), विजय सूर्यभान वहाडणे (अपक्ष), अलिम छोटू शाह (अपक्ष), दीपक गणपतराव साळुंके (अपक्ष) यांचा सामावेश आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली.
यावेळी बॅट या चिन्हासाठी पाच उमेदवारांनी मागणी केली होती. विजय वहाडणे यांना बॅट चिन्ह नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत यशदायी ठरल्याने त्यांनी पुन्हा बॅटसाठी अग्रह धरला होता. अधिकाऱ्यांनी पाच उमेदवारांच्या नावे चिठ्ठी काढली असता, सुदाम उकीरडे यांना बॅट चिन्ह मिळाले. किटली चिन्हासाठी वहाडणेसह तीन उमेदवारांनी मागणी केली. त्यातही वहाडणे अपयशी ठरले. चिठ्ठीच्या रूपाने अशोक नामदेव काळे यांना किटली मिळाली. शेवटी शिट्टीसाठी दोन उमेदवारांची चिठ्ठी काढली असता, त्यात वहाडणेंची शिट्टी वाजली.
दरम्यान राजेश परजणे यांनी विशेष मागणी करून ऍटो रिक्षा हे चिन्ह मिळवले. तर 14 उमेवारांमध्ये कमळ, घड्याळ, हत्ती, जेवणाचे ताट, कप आणि बशी, गॅस सिलिंडर, ट्रक, बॅट, किटली, फलंदाज, ऍटो रिक्षा, शिट्टी, मुसळ आणि खलबत्ता, ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी या निवडणूक चिन्हांचा समावेश आहे.