पुणे – पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहे.
भाजपाने पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबापेठ येथील पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, पुण्यातील या राजकीय घटनेबाबत आता स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केल्याचं दिसून आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे आता कसबा आणि चिंचवड निवडणुकीकडे संपूर्ण राज्यच लक्ष लागलं आहे. भाजपने देखील या निवडणुकीसाठी आपली संपूर्ण ताकद लावली असून, महाविकास आघाडी सरकार देखील आपल्या परीने जोरदार प्रयत्न करत आहे.