महाड दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू

पाच जणांवर गुन्हा दाखल

रायगड – महाड शहरात पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून आणखी काही लोक अद्याप आत अडकल्याची शक्‍यता आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून कालपासून रेस्क्‍यू ऑपरेशन सुरु आहे. जखमींवर महाडच्या देशमुख रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही इमारत सोमवारी सयंकाळी कोसळल्यानंतर महाड नगरपालिकेने तत्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू केले. घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल होण्यापूर्वी स्थानिक नागरिकांच्या मदतीने 7 जणांना बाहेर काढण्यात आले होते. यामध्ये 5 पुरुष तर 2 महिलांचा समावेश होता. एनडीआरएफचे पथक दाखल झाल्यानंतर 12 जणांना रेस्क्‍यू ऑपरेशनद्वारे बाहेर काढण्यात आले. मात्र, यापैकी 11 जण मृतावस्थेत सापडले. तर एका पाच वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. 

पुण्याहून एनडीआरएफची तीन पथकं महाडला दाखल झाल्यानंतर मदत कार्याला आणखी गती मिळाली. घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 10 जेसीबी, 4 पोकलेन तसेच, 15 डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात येत आहे.

मृत नागरिकांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत
मदत आणि पूनर्वसन मंत्री यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लोकांचे जीव गेले आहेत. जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शासन होईल. मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत केली जाईल. यामध्ये चार लाख रुपयांची मदत आणि पुनर्वसन खात्यातर्फे तर 1 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्यात येतील. जखमींना पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत. या घटनेत ज्यांनी आपले घर गमावले आहेत त्यांनाही आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

पाच जणांवर गुन्हा दाखल
या इमारत दुर्घटनेमागे सकृतदर्शनी कमकुवत बांधकाम हेच कारण असल्याचे दिसून येत आहे. याची गंभीर दखल घेत महाड नगरपालिकेने बिल्डर फारुक काझी, आर्किटेक्‍ट गौरव शहा, आरसीसी सल्लागार बाहुबली धामणे, महाड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक झिंझाड, तत्कालीन कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक शशिकांत दिघे यांच्याविरोधत फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी काशिद हे करणार आहे.

देव तारी त्याला कोण मारी
“देव तारी, त्याला कोण मारी’ या उक्‍तीचा प्रत्यय या दुर्घटनेत आला. इमारतीच्या ए विंगमधील फ्लॅट क्रमांक 303 मध्ये बांगी कुटुंब राहत होते. या कुटुंबातील एक 30 वर्षीय महिला आणि तिची 7, 4 आणि 2 वर्षांची मुलेही ढिगा-याखाली अडकली होती. यातील 4 वर्षांचा मुलगा महंम्मद बांगी याला एनडीआरएफच्या पथकाने 17 तासानंतर ढिगा-याखालून जीवंत बाहेर काढले. यानंतर “गणपती बाप्पा मोरया’ असा एकच जयघोष करण्यात आला. दुर्दैवाने काही मिनिटानंतर त्याची आई नैसिन बांगी यांचा मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.