बाधितांची संख्या तीन हजार पार; आयुक्तांचा अंदाज ठरला खरा
पिंपरी – शहरातील बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत असून दिवसभरात 126 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दिवसभरात चौघांचा मृत्यू झाला आहे. आजच्या बाधितांमध्ये शहरातील 120 जणांचा तर शहराबाहेरील 7 जणांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 3029 वर पोहोचली आहे. महिनाअखेरपर्यंत शहरातील बाधितांची संख्या तीन हजारांहून अधिक असेल असा अंदाज आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बोलून दाखविला होता तो आज तंतोतंत खरा ठरला.
मंगळवारी प्राप्त अहवालानुसार शहरातील 120 जणांना तर शहराबाहेरील 7 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. शहराबाहेरील रुग्णांमध्ये 4 पुरुषांचा आणि 3 महिलांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये शहरातील दोघांचा व शहराबाहेरील दोघांचा समावेश आहे. शहरातील इंदिरानगर चिंचवड येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा व अण्णासाहेब नगर चिंचवड येथील 35 वर्षीय इसमाचा मृतांमध्ये समावेश आहे. तर खडकी बाजार, पुणे येथील 59 वर्षीय महिलेवर तसेच मुलुंड (मुंबई) येथील रहिवाशी असलेल्या 58 वर्षीय पुरुषावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
त्यामुळे शहरातील मयतांची संख्या 47 वर तर शहराबाहेरील मयतांची संख्या 30 वर पोहोचली आहे.
आतापर्यंत शहरातील 1862 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 175 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 145 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 18141 जणांच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 13884 जणांचे अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
1211 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयीत असलेले 886 जण महापालिकेच्या रुग्णांलयांमध्ये दाखल झाले आहेत. तर शहरातील 1116 आणि शहराबाहेरील 68 जणांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
रुग्णांमध्ये महिलांचा आकडा वाढला
शहरातील बाधितांची संख्या वाढत असतानाच आता करोनामुळे बाधित होत असलेल्या महिलांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आज बाधित असलेल्या शहरातील 120 जणांमध्ये महिलांचे प्रमाण तब्बल 82 इतके आहे. पुरुषांपेक्षा दुप्पटीने महिलांमध्ये बाधितांचे प्रमाण वाढण्याची आजची शहरातील ही पहिलीच वेळ आहे.