पुणे : लालचुटूक लिचीचा हंगाम बहरात आला आहे. मार्केट यार्डातील फळ बाजारात कोलकाता, बिहारमधून दररोज 12 ते 15 टन फळाची आवक होत आहे. किरकोळ बाजारात 1 किलोला 200 ते 250 रु. किलो भाव मिळत आहे.
दरवर्षी लिचीचा हंगाम मे च्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो. फळाची बिहार तसेच पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होते. गेल्या काही दिवसांपासून बाजारात लिचीची आवक वाढली आहे. साधारण 1200 ते 1500 खोकी रेल्वेने पाठविण्यात येत आहेत. एका खोक्यात दहा किलो लिची असते. गेल्या काही वर्षांपासून विमानाने लिची पाठविण्यात येत आहे. विमानाने पाठविण्यात येणाऱ्या लिचीचे भाव जास्त असतात. घाऊक बाजारात रेल्वेने पाठविण्यात येणाऱ्या 10 किलो लिचीच्या खोक्याचे भाव 1200 ते 1500 रुपयांपर्यंत आहेत. विमानाने पाठविण्यात येणाऱ्या लिचीच्या खोक्याचे भाव 1500 ते 2000 रुपयांपर्यंत आहेत, असे मार्केट यार्डातील लिची व्यापारी राजेश परदेशी यांनी सांगितले.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा लिचीचे भाव कमी आहेत. मार्केट यार्डातील फळ बाजारातून महाबळेश्वर, लोणावळा येथे लिची विक्रीस पाठविण्यात येत आहे. लिचीचा हंगाम 25 जुलैपर्यंत सुरू असतो, असे त्यांनी नमूद केले.
सध्या बाजारात बिहारमधील लिची मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यानंतर पंजाबमधील पठाणकोट परिसरातील लिची बाजारात दाखल होईल. हंगामाच्या शेवटच्या टप्यात सिमला परिसरातून लिचीची आवक सुरू होईल, असे परदेशी यांनी सांगितले.