पुणे : नागरिकांना रेल्वेने पार्सल पाठवण्याची सूविधा अधिक सोयीस्कर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नुकताच एक हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांना पार्सल पाठवताना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत, तसेच त्यांना त्यांच्या पार्सलचे अचूक ठिकाण कळणार आहे.
रेल्वेला मिळणाऱ्या उत्पादनात सर्वाधिक वाटा हा मालवाहतुकीतून मिळतो पण या मालवाहतुकीबरोबरच रेल्वेने पार्सल पाठवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्सल सूविधांबाबत नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. पार्सलच्या सर्वाधिक तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे येत होत्या त्यात दिवसेंदिवस वाढच होत होती. या तक्ररारींची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून नागरिकांनी रेल्वेतून पाठविलेल्या पार्सलची माहिती त्यांना मिळावी, यासाठी रेल्वेने 9699746080 हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.
या क्रमांकावर फोन केल्यास नागरिकांना त्यांच्या पार्सलची स्थिती, नवीन पार्सल कसे पाठवायचे, अशा गोष्टींची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना पार्सल पाठविताना कोणत्याही अडचणी येणार नाही. ही सुविधा पुणे रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी सुरू केली आहे.
प्रवाशांना पार्सल पाठविताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाने हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना पार्सल पाठवण्याची सुविधा सुलभ होईल आणि त्याचे अचूक ठिकाण कळेल.
– मनोज झवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग