पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचले असून, या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी संशयित गुंड सिद्धेश कांबळे ऊर्फ सौरभ महाकाळ याला बुधवारी अटक केली. त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मोक्काचे विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सौरभला मंगळवारी संगमनेरजवळ ताब्यात घेतले आणि बुधवारी शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर केले. बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष जाधव फरार असताना आरोपी सौरभने त्याला आश्रय दिला. त्याबाबत त्याच्याकडे चौकशी करून संतोष जाधवचा शोध घ्यायचा आहे, तसेच मुसेवाला खून प्रकरणातही संतोष जाधवसह सौरभचे नाव पुढे आले असून, त्याबाबतही तपास करायचा आहे. दोघे पाच राज्यात ओळख लपवून वेगवेगळे मोबाइल वापरून राहत होते. ते जेथे राहत होते. त्या ठिकाणी जाऊन तपास करणे, त्यांना मदत कोणी केली आहे. त्यासाठी सौरभला पोलीस कोठडी देण्याची मागणी मोक्काचे विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावात 29 मे रोजी मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुसेवाला खून प्रकरणात पंजाब, राजस्थानमधील लॉरेन्स बिष्णोई टोळीचा हात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. मुसेवालावर गोळ्या झाडणाऱ्या दहा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. मंचरमधील गुंड संतोष जाधव आणि त्याचा साथीदार सौरभ महाकाळ मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आरोपी आहेत.
संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांनी गेल्या वर्षी आंबेगाव तालुक्यात ओंकार बाणखेले याचा गोळ्या झाडून खून केला होता. तेव्हापासून दोघे पसार होते. जाधव आणि महाकाळ पंजाब, राजस्थानात पसार झाले होते. राजस्थानात खंडणीसाठी एका व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी जाधवला अटक केली होती. राजस्थानातील कारागृहात तो लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित तसेच मोक्का कारवाईनंतर पसार झालेला आरोपी महाकाळ पुणे जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके आणि पथकाने त्याला ताब्यात घेतले. मुसेवाला खून प्रकरणात आतापर्यंत पंजाब पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.