इंफाळ – मणिपुरातील दंगेखोरांनी राज्याच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लुटून नेलेल्या शस्त्रांपैकी 1195 शस्त्रे आतापर्यंत जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. यात बंदुका, रायफल्स आणि पिस्तुले अशा शस्त्रांचा समावेश होता.
जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांपैकी खोऱ्यातील जिल्ह्यांतून 1,057 शस्त्रे आणि डोंगरी जिल्ह्यांतून 138 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय, हजारो बंदुकीच्या गोळ्या आणि दारूगोळा देखील जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, लुटलेली शस्त्रे आणि दारूगोळा परत मिळवण्यासाठी सुरक्षा दल सतत डोंगरी भाग आणि मणिपुर व्हॅली भागात छापे टाकत आहे.
पोलीस महासंचालक राजीव सिंह म्हणाले, सुरक्षा दलांकडून शस्त्रे लुटणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. मणिपुरात गेल्या 3 मे पासून जो प्रचंड हिंसाचार झाला आहे,
त्यासाठी पोलिसांकडून लुटण्यात आलेल्या शस्त्रांचाच मुक्तपणे वापर झाला आहे. राज्यातील पोलीस दलाची शस्त्रे आणि दारूगोळा दंगेखोरांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात लुटला गेल्याचे अलिकडच्या काळातही हे अनोखेच प्रकरण आहे.