बीजिंग – चीनच्या वायव्येकडील डोंगराळ प्रदेशामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास बसलेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यात किमान ११८ जण ठार झाले. तर ५०० लोक जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता ६.२ इतकी होती, असे स्थानिक भूकंप मदत मुख्यालयाने म्हटले आहे.
या भूकंपाचे धक्के गान्सू आणि क्विंगहाई प्रांतांनाही बसले, असे चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटरने म्हटले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू लिउगौ टाउनशिप गान्सूमधील लिनक्सिया हुई स्वायत्त प्रांतातील जिशिशन बाओआन, डोंगक्सियांग, साला स्वायत्त प्रांताच्या मुख्य शहरापासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपामुळे स्थानिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांंनी सांगितले.
किंगहाई प्रांत हा तिबेटच्या हिमालयातील डोंगराळ भागाला लागून आहे. भूस्तरांच्या हालचालींमुळे हा भाग भूकंपप्रवण बनला आहे.
भूकंपाचा दुसरा धक्का शिन्जियांग उघ्युर स्वायत्त भागाला आज सकाळी पावणे १० वाजता बसला. या स्वायत्त प्रांतातील किझील्सू किरगीझ भागाला या भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटरवर होता.
भूकंपामुळे गांसूमध्ये १०५ जणांचा मृत्यू झाला, तर क्विंगहाईमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. भूकंपग्रस्त भागात आतापर्यंत ५७९ लोक जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिशिशनमधील ६,३८१ घरांचे नुकसान झाले आहे.
आतापर्यंत ३२ आफ्टरशॉक नोंदवले गेले आहेत, त्यात सर्वात मोठे ४.० तीव्रतेच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. भूकंपामुळे काही ग्रामीण रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. वीजपुरवठा खंडित झाला आणि दूरसंचार यंत्रणाही कोलमडली आहे. परिणामी अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठा खंडित झाला.
प्रांतीय अग्निशमन आणि बचाव विभागाने ८८ अग्निशामक इंजिन, १२ शोधपथके, श्वान पथके आणि १० हजाराहून अधिक उपकरणांसह ५८० कर्मचारी आपत्ती क्षेत्रात पाठवले गेले आहेत.