नाशिक – नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात करोनाने शिरकाव केला असून येथे तब्बल 118 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात पोलीस, प्रशिक्षणार्थी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे नाशिक जिल्हा प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
नाशिकमध्ये बुधवारी एका तीन महिन्यांच्या बाळाचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर आता नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात करोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत उपनिरीक्षक पदासाठी प्रशिक्षण दिले जाते आहे.
या ठिकाणी राज्यभरातून उमेदवार प्रशिक्षणासाठी आलेले असतात. या सर्वांची करोना चाचणी घेण्यात आली असता त्याचा अहलाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व करोनाबाधित रुग्णांना नाशिकच्या ठक्कर डोम कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या करोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे नागरिकही धास्तावले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन, राज्य सरकार यांच्याकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. ख्रिसमस आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यूही लावण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.