बंगळूर – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना पदावरून हटवण्याचा भाजप नेतृत्वाचा मानस आहे. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे येडियुरप्पा यांच्या विरोधात भाजप नेतृत्वाच्या हाती मजबूत अस्त्र आले आहे, असे कॉंग्रेसने म्हटले आहे.
भ्रष्टाचाराशी संबंधित एका प्रकरणात येडियुरप्पा यांच्यावर काही वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला. तो रद्द करण्याच्या मागणीची येडियुरप्पा यांची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यावरून माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना एक सेकंदही पदावर राहण्याचा अधिकार उरलेला नाही. भाजप नेतृत्वाने हस्तक्षेप करून येडियुरप्पा यांना पायउतार होण्यास सांगावे, असे ते म्हणाले. येडियुरप्पा यांच्या जागी नवा मुख्यमंत्री देण्याच्या हालचाली भाजपच्या गोटात सुरू असल्याचा दावा सिद्धरामय्या सातत्याने करत आहेत.