अबुजा, (नायजेरिया) – करोना विषाणूची नवी प्रजाती दक्षिण ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत आढळल्यामुळे या देशांची विमानसेवा अनेक देशांनी थांबवली आहे. त्या पार्श्वभुमीवर नायजेरियामध्ये करोना विषाणूची आणखी एक नवीन प्रजाती आढळल्याचे वृत्त समोर आले आहे.
आफ्रिकेतील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मात्र या विषाणूच्या नवीन प्रजातीबाबत अधिक माहिती मिळण्यासाठी विस्तृत संशोधन आवश्यक आहे, असेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण ब्रिटनमध्ये सापडलेल्या प्रजातीपेक्षाही ही प्रजाती वेगळी आहे, असे “आफ्रिकन सेंटर फॉर अिडसीज कंट्रोल ऍन्ड प्रिव्हेन्शन’चे प्रमुख जॉन निकेनगासॉंग यांनी सांगितले.
नायजेरियातील “सीडीसी’ आणि “आफ्रिकन सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर जिनॉमिक्स ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस’कडून यासंदर्भात अधिक नमुन्यांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे यासंदर्भात आताच काहीही ठोसपणे सांगता येऊ शकणार नाही. त्यासाठी आणखी काही काळ थांबावे लागेल, असेही निकेनगासॉंग यांनी सांगितले.
विषाणूच्या दोन किंवा तीन जेनेटिक सिक्वेन्सच्या आधारे नायजेरियात नवीन विषाणूची प्रजाती आढळली असल्याचे म्हटले जात आहे. त्यापूर्वीच गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत नवीन प्रजातीमुळे आपत्कालिन सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे. आफ्रिका “सीडीसी’ची आपत्कालिन बैठक या आठवड्यात होणार आहे.
आफ्रिका खंडात अनेक ठिकाणी विषाणूचा संसर्ग वाढल्याचे वृत्त समोर आले आहे. हा संसर्ग या नवीन प्रजातीमुळेच झाला आहे, हे स्पष्ट झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतील एकूण बाधितांची संख्या 10 लाखांवर पोहोचली आहे.