कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेऊन पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशमधील जबलपूरकडे आज सायंकाळी 5 वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या 22 बोगीमधून 1 हजार 66 मजूर आपा-पल्या गावी मार्गस्थ झाले.
मध्यप्रदेश शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध तालुक्यांमधील मजुरांची यादी करुन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून जलबपूरकडे जाणाऱ्या रेल्वेचे नियोजन केले होते. कोल्हापूर परिवहन विभागाच्या बस, विविध शैक्षणिक संस्थांच्या महाविद्यालयीन विद्यार्थी वाहतूक बसमधून मंजुरी मिळालेल्या कामगारांना छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आणण्यात आले. याठिकाणी प्रवासाची रेल्वे तिकीटे त्यांना देण्यात आली. थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दाखविलेल्या हिरव्या झेंड्यानंतर जिल्ह्यातील ही पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशकडे रवाना झाली.
मध्यप्रदेशमधील जबलपूरकडे रवाना झालेल्या 1 हजार 66 कामगारांना पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रवाशाला फूड पॅकेट, पाणी बॉटल देण्यात आली. त्याचबरोबर उद्या सकाळसाठी बिस्कीटे, फरसाण, चिरमुरे याचेही वाटप करण्यात आले.
महाराष्ट्राबाहेर तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये अडकलेले जिल्ह्यातील कामगार, पर्यटक, प्रवासी, विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्यातील 20 तपासणी नाक्यांमधून त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. प्रवेश केल्यानंतर त्यांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये यापूर्वी सीपीआर, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज आणि आयजीएम रुग्णालय इचलकरंजी या तीन रुग्णालयांचा समावेश होता. परंतु त्यांची संख्या वाढवून आता एकूण 13 कोविड केअर रुग्णालय उभारण्यात आली आहेत.
22 बोगीमधून 1 हजार 66 कामगार
करवीरमधील 362, इचलकरंजीमधील 96, शिरोळमधून 112, गगनबावडामधील 13, हातकणंगलेमधून 388, शाहूवाडीमधील 8, कोल्हापूर शहरातील 13, पन्हाळामधील 59, कागलमधील 15 असे एकूण 1 हजार 66 कामगार रेल्वेच्या 22 बोगीमधून आपा-पल्या गावी आज रवाना झाले.
मंजुरीनंतर इतर राज्यातील कामगारांची रवानगी-जिल्हाधिकारी
जिल्ह्यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक अशा राज्यातील कामगार, पर्यटक, प्रवासी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, या सर्वांची यादी संबंधित राज्यांच्या जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. मंजुरी मिळालेल्या आज मध्यप्रदेशमधील 1 हजार 66 जणांना जबलपूरकडे आज पाठविण्यात आले आहे.