100 गटांकडून शहरात केली जात आहे वातावरण निर्मिती
अहमदाबाद: मुंबईनंतर गुजरातमधील अहमदाबाद शहरांमध्ये करोना व्हायरसचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी अहमदाबाद शहरात अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. नागरिकांनी फक्त डिजिटल व्यवहार करावे. नोटांची देवाण-घेवाण करू नये असा निर्णय अहमदाबाद प्रशासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
यासाठी सर्व व रिटेल दुकानदारांना व घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. व्यवहार करताना या कंपन्यातील व्यक्तींनी 100% डिजिटल व्यवहार करावे असे सांगण्यात आले आहे. गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव गुप्ता यांनी सांगितले की, नोटांच्या माध्यमातून करोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. 15 मे पासून शंभर टक्के व्यवहार डिजिटल होतील याची काळजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदाबाद शहरातील रुग्ण संख्या सहा हजारांवर गेली आहे. यामुळे गुजरात प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. डिजिटल पेमेंट यंत्रणा सक्रिय करण्यासाठी अहमदाबाद महानगरपालिकेने 100 गट तयार केले आहेत. हे सर्व गट 17,000 दुकानदार आणि दूध, फळे, भाजीपाला पुरवठादारांना ऑनलाइन पेमेंट कसे स्वीकारावे यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
त्याचबरोबर ग्राहकांनीही यासाठी तांत्रिक तयारी करावी, याकरिता मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. या पंधरवड्यात अहमदाबाद शहरातील संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आणण्याचा संकल्प आम्ही केला आहे असे गुप्ता यांनी सांगितले. मालाचा पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दैनंदिन पातळीवर तपासणी करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांना आरोग्य सेतू वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत.