यंदा 100 टक्के पाऊस; हवामान खात्याचा पहिला अंदाज
पुणे – करोनामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हवामान खात्याने दिलेल्या मान्सूनच्या अंदाजामुळे थोडा दिलासा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील अंदाजानुसार यंदा जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या 100 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यात प्रमाण 5 टक्के कमी-अधिक होऊ शकते.
दरवर्षी भारतीय हवामान खात्याच्या वतीने (आयएमडी) एप्रिल महिन्यात मान्सूनचा पहिल्या टप्प्यातील अंदाज जाहीर करण्यात येतो. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वतीने बुधवारी अंदाज जाहीर केला. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन आणि हवामान विभागाचे महासंचालक एम. महापात्रा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, यंदा साधारण 96 ते 104 टक्के पावसाची शक्यता 41 टक्के आहे. तर 104 ते 110 टक्के पावसाची शक्यता ही 21 टक्के आहे. 110 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची शक्यता 9 टक्के इतकी आहे. 90-96 टक्के पावसाची शक्यता 22 टक्के आहे.
तर, 90 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता ही 9 टक्के आहे. मान्सून मिशन अंतर्गत विकसित केलेल्या मॉडेलनुसार यंदा सरासरीच्या 104 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची शक्यता 70 टक्के अधिक आहे. मान्सून काळात प्रशांत महासागरात निनो स्थिती न्युट्रल राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल न्युट्रल राहणार आहे. या दोन्ही घटकांमुळे मान्सूनला फायदाच होणार आहे. मान्सूनच्या आगमनाचे वेळापत्रकसुद्धा यंदा थोडे फार बदलण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये नियमित म्हणजे 31 मे किंवा 1 जूनदरम्यान दाखल होईल. त्यानंतर पुण्यात 10 जूनदरम्यान तर, मुंबईमध्ये 19 जूनदरम्यान दाखल होईल. दिल्लीमध्ये मान्सून साधारण 27 जूनच्या आसपास पोहोचेल, असेही “आयएमडी’च्या वतीने सांगण्यात आले. यंदाचा मान्सून सर्वसाधारण स्वरूपाचा राहणार असल्याने पिकांसाठी दिलासादायक चित्र यंदा पाहण्यास मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.