ब्रिसबेन – ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात आलेल्या वादळामुळे किमान १० जण ठार झाले आहेत. क्वीन्सलॅन्ड आणि विक्टोरिया या दोन राज्यांमध्ये सोसाट्याचे वारे वहात असून त्यामुळे मोरेटन उपसागरामध्ये उंच लाटा उसळल्या. त्यामुळे एक बोट बुडून तिघेजण बुडाले आहेत.
या दुर्घटनेतील ८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. हे सर्व जण ३९ फुटी तराफ्यातून वार्षिक मासेमारी उत्सवामध्ये सहभागी झाले होते. वादळामुळे तराफा उलटला होता. त्याचवेळी बचावासाठी तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बहुतेकांना वाचवल्याचे क्विन्सलॅन्डचे प्रभारी पोलीस प्रमुख अधिक्षक ऍन्ड्रयू पिलोट्टो यांनी सांगितले.
एका अन्य घटनेमध्ये क्विन्सलॅन्ड शहरात अंगावर झाड पडल्यामुले एका महिलेचा मृत्यू झाला. तर ब्रिस्बेन शहरात पूराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका मुलीचा मृतदेहही नंतर सापडला आहे. मेरी नदीलाही पूर आला असून या पूरामध्ये अन्य दोन महिला बुडून मरण पावल्या आहेत. अन्य एका महिलेला वाचवण्यात यश आले. विक्टोरिया शहरात देखील एका ओनोळखी महिलेचा मृतदेह पूराचे पाणी ओसरल्यावर आढळून आला. कॅरिंगल भागातल्या एका गावात घरावर झाड कोसळल्यामुळे एक जण मरण पावला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या अग्नेयेकडील भागात गेल्या २४ तासात अत्यंत विपरीत हवामान निर्माण झाले आहे. मुसळधार पास आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे क्विन्सलॅन्डमध्ये किमान एक हजार उर्जा प्रकल्प बंद पडले आहेत. त्यामुळे ८५ हजार लोकांसाठीचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे.