चंडिगढ – कॉंग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी सकाळी अचानकपणे हरियाणातील एका कुस्तीच्या आखाड्यात पोहचले. तिथे त्यांनी कुस्तीपटूंची भेट घेऊन त्यांचा दिनक्रम समजून घेतला. त्यावेळी ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया हाही उपस्थित होता.
राहुल सातत्याने समाजातील विविध घटकांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची भेट घेताना दिसतात.
सध्या वादग्रस्त ठरलेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीवरून वातावरण तापले आहे. अशात राहुल यांनी हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील छारा गावात असणाऱ्या आखाड्याला भेट दिली. तिथे उपस्थित असणाऱ्या बऱ्याच कुस्तीपटूंना त्या भेटीची कल्पना नव्हती. त्यामुळे राहुल यांना पाहून ते चकित आणि खुषही झाले.
राहुल यांनी बजरंगसमवेत कुस्ती खेळली. त्यांनी कुस्तीपटूंसमवेत दूध, बाजरीची भाकरी आणि साग या पदार्थांचा आस्वाद घेतला. स्थानिक शेतकऱ्यांकडून काही भाज्या पिकवल्या जातात. त्यातील काही राहुल स्वत:समवेत घेऊन दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या भेटीतून कॉंग्रेसने पक्ष कुस्तीपटूंच्या पाठिशी असल्याची ग्वाही दिल्याचे मानले जात आहे.