निवडणूक भरारी पथकाने पकडला 10 किलो गांजा

संगमनेर – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गैरप्रकार रोखण्यासाठी तालुक्‍यात निवडणूक प्रशासनाकडून नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत फक्त बेनामी रोकड पकडली होती. परंतु भरारी पथकाला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या कारवाईत शिर्डीकडून-मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी बसमध्ये दोन आरोपींना सुमारे 55 हजार किमतीचा 10 किलो गांजासह पकडण्यात यश आले आहे.

अल्ताफ फकीर मोहम्मद अन्सारी (वय-20, रा.सायन कोळीवाडा, प्रतीक्षानगर, मुंबई) आणि सुमेध रवींद्र कसबे (वय-22, रा.सायन कोळीवाडा, प्रतीक्षानगर, मुंबई) असे पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर येथील स्थापत्य अधिकारी मुकेश प्रकाश पर्बत हे काल रात्री निवडणूक आयोगाच्या भरारी पथकात आपल्या सहकाऱ्यांसह कर्तव्य बजावत असताना मध्यरात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान संगमनेर लोणी रस्त्यावरील वडगावपान फाटा येथे शिर्डीकडून मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसची (क्र. एमएच 04 जीपी 0099) झडती घेत असताना वरील आरोपींच्या ताब्यात 55 हजार 300 रुपये किमतीचा गांजा दोन पिशव्यांत भरलेले आढळून आला. त्यानुसार मुकेश पर्बत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधेद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम प्रमाणे गुन्ह्याची नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.