मोदी सरकारला जनता माफ करणार नाही

खा. उदयनराजे भोसले : वाईत कॉंग्रेसप्रणीत मेळाव्यात भाजप सरकारवर टीका

वाई – मोदी सरकारच्या काळात शेतीप्रधान देशात शेतकऱ्याच्या मालाला बाजारात कवडीमोल भावाने आपला माल विकावा लागल्याने सध्या शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. सबका विकास सर्वसामान्य जनतेचा सत्यानाश अशी परिस्थिती आज येवून ठेपली आहे. खोटी आश्‍वासने देवून आजच्या तरुणांना देशोधडीला लावणाऱ्या भाजप सरकारला पायउतार व्हावेच लागणार आहे, कष्टकरी जनता, सामान्य शेतकरी यांना देशोधडीला लावणाऱ्या मोदी सरकारला पर्यायाने भाजपला जनता कदापीही माफ करणार नाही, अशी घणाघाती टीका श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले यांनी वाई येथील साठे धर्मशाळेत कॉंग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना केली.
अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते.

या प्रसंगी माजी जीप सदस्य सुनील काटकर, युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विराज शिंदे, युवा नेते विकास शिंदे, प्रतापराव देशमुख, व्याजवाडीचे माजी सरपंच संतोषराव पिसाळ, मानसिंग चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा सौ. धनश्री महाडिक, महिला तालुकाध्यक्षा सौ. अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस मंजिरी पानसे, खंडाळा पंचायत समिती उपसभापती वंदनाताई धायगुडे, वाई पंचायत समिती माजी सभापती सौ. सुनिता शिंदे, भाऊसाहेब शेळके, अतुल पवार, गुरुदेव बरदाडे, अजय धायगुडे, प्रदीप जायगुडे, विजयराव भिलारे, मुन्नाभाई वारुंगकर, मदन ननावरे, रवींद्र भिलारे, जयदीप शिंदे, विक्रम वाघ, विलास पिसाळ, सदाशिव अनपट, यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा. उदयनराजे भोसले म्हणाले, लोकसभेची निवडणूक वाई विधानसभा मतदार संघाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे. सध्या देशात व राज्यात असणाऱ्या मोदी सरकारने एक रुपयाचाही निधी सातारा जिल्ह्याला दिला नाही. उलट शेतकऱ्यांचा मालाला कवडी-मोल भाव देवून संपूर्ण शेतकरीच उध्वस्त केला. देशात तरुणांची बेरोजगारी वाढली आहे. राज्याचा पालनकर्ता शेतकरी अडचणीत सापडल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला. भाजपच्या रामराज्यात शेतकऱ्यांसाठी मरा राज्य आले आहे. एकंदरीत देशात आणि राज्यात आघाडीला बदनाम करून आलेल्या भाजपा सरकारने सामान्य जनतेलाच देशोधडीला लावले, असाही घणाघाती आरोप खासदारांनी भाजप सरकारवर केला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांच्या खोट्या विकासाच्या नावाखाली मत मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराचा जाब विचारल्याशिवाय जनता राहणार नाही. येणाऱ्या 23 तारखेला राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांच्या आघडीचे उमेदवार श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या घड्याळ या चिन्हापुढे बटण दाबून भरघोस मतांनी निवडून देवून देशासह राज्यातील महागठ्‌बंधानाचे हात बळकट करा. असेही आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतात भाजप सरकारवर जाहीर टीका करीत महाराजांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रदीप जायगुडे यांनी सूत्रसंचालन केले जयदीप शिंदे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास वाई-खंडाळा, महाबळेश्‍वर मतदार संघातील कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, युवा नेते विकास शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.