नवी दिल्ली -देशात करोना लसींचा तुटवडा भासत असल्याने लसीकरण मोहीम मंदावली आहे. यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यासाठी करोना लसींची अतिरिक्त माहिती केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिली जात आहे.
येत्या जून महिन्यात 12 कोटी लस उपलब्ध असतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. आता सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारला जून महिन्यात 10 कोटी लस देणार असल्याचे सांगितले. याबाबतचे पत्र सीरम इन्स्टिट्यूटने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जून महिन्यात आम्ही 10 कोटी कोविशिल्ड व्हॅक्सिनची निर्मिती करत पुरवठा करणार आहोत. मे महिन्यात 6.5 कोटी डोसची निर्मिती केली होती आणि पुरवठा केला होता. देशातील मागणी पाहता आम्ही लसींचे उत्पादन वाढवले आहे.
सीरम इन्स्टिट्यूट देशातील नागरिकांची काळजी घेण्यास कटिबद्ध आहे. आमची संपूर्ण टीम सरकारच्या खांद्याला खांदा लावून करोनाविरुद्ध लढण्यास मैदानात उतरली आहे, असे कंपनीच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
पुण्यातील कोविशिल्ड व्हॅक्सिननिर्मिती कंपनीत दिवस-रात्र काम सुरू असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. देशातील करोना लसींची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यात सांगण्यात आले आहे.