जुन्नर – संकष्टी चतुर्थी आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त आज (दि. 19) श्रीक्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील गिरीजात्मजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगली कोल्हापुर परिसरातील पुरग्रस्तांना 1 लाख 11 हजार 111 रुपयांची मदत करण्यात आली. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी सुमारे 50 ते 60 हजार भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे 4 वाजता देवस्थान ट्रस्टचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, विश्वस्त गोविंद मेहेर, प्रभाकर जाधव, मच्छिंद्रशेठ शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक भक्त उपस्थित होते. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी 6:00 वाजता व दुपारी 12:00 वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम चालू होते.