जुन्नर -लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील गिरिजात्मज गणेशास संकष्टी चतुर्थीनिमित्त केळी व फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. हा सर्व केळी प्रसाद रुपाने येथील माकडांना देण्यात येणार आहे.
चतुर्थीनिमित्त श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी देवस्थानचे सेक्रेटरी जितेंद्र बिडवई व विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. करोनामुळे व लॉकडाऊनचे निर्बंध चालू असल्याने मंदिरे व धार्मिक स्थळे बंद आहे.
भाविक नसल्याने माकडांना खाद्यपदार्थ मिळत नाहीत. यामुळे देवस्थान ट्रस्टने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर भाविकांच्या मदतीतून माकडांना खाद्यपदार्थ पुरवले जात आहेत, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.