BJP Manifesto | Lok Sabha Election 2024 । 2024च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. देशभरात सात टप्प्यात मतदान होणार आहे.
सध्या सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले असून, प्रचाराला देखील जोरदार सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने आपला “न्याय पत्र” नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. यात राहुल गांधींनी जनतेसाठी 25 हमी दिल्या आहेत. कुटुंबातील सर्वात गरीब महिलांना वार्षिक 100,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मुख्य वचन दिले आहे. अश्या अनेक हमी यामध्ये देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अश्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून “संकल्प पत्र” नावाचा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करतील. यावेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहणार आहेत.
भाजपच्या जाहीरनाम्यात विकास, समृद्ध भारत, महिला, तरुण, गरीब आणि शेतकरी यांच्यावर भर असेल. पक्ष केवळ तीच आश्वासने देणार आहे जी येत्या काही वर्षात पूर्ण करण्याचा भाजपचा संकल्प असेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील भाजपचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. । BJP Manifesto | Lok Sabha Election 2024