– निगरगट्ट प्रशासनाचे गैरसोयीकडे दूलर्क्ष
पुणे : महापलिकेतील क्षेत्रफळानुसार, सर्वात मोठा प्रभाग असलेल्या प्रभाग 26 ( महंमदवाडी- कौसरबाग) मधील हाडेंवाडी रस्ता, काळेपडळ, हांडेवाडी भागात नागरिकांना तीन ते चार दिवसातून अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्या पेक्षाही वाईट बाब म्हणजे, या भागात रात्री 12 ते 4 या वेळेत पाणी येत असल्याने पाण्यासाठी रात्री जागूनही केवळ 15 ते 20 मिनिटच पाणी येत नसल्याने या भागातील नागरिकांवर पाण्यासाठी वनवण फिरण्याची वेळ आली आहे, तर या भागात मोठया प्रमाणात कष्टकरी वर्ग असल्याने त्यांनाच या समस्येचा मोठा फटका बसत आहे. तर या समस्ये विरोधात स्थानिक नगरसेवकांकडून वारंवार आंदोलने करूनही पाणी पुरवठा विभागाच्या निगरगट्ट अधिकाऱ्यांकडून त्याकडे दूर्लक्ष केले जात असल्याने नगरसेवकही हतबल झाले आहेत.
शहरातील इतर प्रभागांमध्ये दिवसा पाणी पुरवठा केला जात असताना, गेल्या अनेक वर्षांपासून या भागात दोन ते तीन दिवसातून तसेच अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.
त्यातही काळेपडळ, हांडेवाडी रोड परिसरात रात्री 12 ते 4 वेळेत 2 ते 3 दिवसांनी व रात्री कमी दाबाने जेमतेम अर्धा तास पाणीपुरवठा होतो. या भागात मोठया प्रमाणात कामगार तसेच कष्टकरी वर्ग राहवयास असून दिवसभर कष्टाच्या कामासाठी हे नागरिक बाहेर असतात तर रात्री त्यांना पाण्यासाठी जागावे लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत असून दररोज पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या प्रभागाला पाणी देण्यासाठी काळेपडळ जवळ तसेच कृष्णानगर चौक येथे व्हॉल्व्ह आहे. मात्र, त्या ठिकाणाहून मुंढवा तसेच मगरपट्टासाठी पाणी पुरवठा केला जात असताना, त्या भागात कोणत्याही तक्रारी नाहीत पुरेसे पाणी दिले जाते त्याच वेळी या भागात मात्र पाण्याची बोंब आहे. ही बाब नगरसेवक नाना भानगिरे यांनी अनेकदा आंदोलने करून प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिली. मात्र, त्यानंतर पुढे काहीच होत नसल्याने उन्हाची तीव्रता वाढतानाच नागरिकांना पाण्यासाठी चांगलेच हाल सहन करावे लागत आहे.