तिघांवर गुन्हे दाखल : दारूसाठा जप्त
शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पोलिसांनी नुकत्याच दौंड उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी रांजणगाव गणपती येथे कारवाई करण्यात आल्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दारूविक्री होत असलेल्या ठिकाणी छापे टाकून दारूच्या बाटल्या जप्त केले. याप्रकरणी गणेश बलभिलराम दिक्षित व उमेश लक्ष्मण बालगुडे (दोघे रा. सणसवाडी) व निलेश खामकर (रा. शिक्रापूर) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, हवालदार दत्तात्रय शिंदे, हेमंत इनामे, योगेश नागरगोजे, संदीप जगदाळे, संजय ढमाळ यांनी शिक्रापूर येथील त्रिमूर्ती हॉटेलच्या पाठीमागे, सणसवाडी येथील जय मल्हार हॉटेलच्या पाठीमागे व सणसवाडी येथील वर्षा बिअरशॉपीच्या पाठीमागे छापा टाकत सणसवाडी येथून गणेश बलभीलराम दीक्षीत व उमेश लक्ष्मण बालगुडे (दोघे रा. सणसवाडी, ता. शिरूर) यांना ताब्यात घेतले.
शिक्रापूर येथील त्रिमूर्ती हॉटेलच्या पाठीमागे दारू विक्री करणारा निलेश खामकर (रा. शिक्रापूर) हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत वेगवेगळ्या देशी विदेशी स्वरूपाच्या तीन हजार पाचशे तीस रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करीत आहेत.