अखिलेश यादव म्हणतात, भाजपचे दिवस भरले
लखनौ : -उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उजवा हात अशी एकेकाळी ओळख असणारे नेते सुनील सिंह यांनी शनिवारी समाजवादी पक्षात (सप) प्रवेश केला. योगींनी 2002 मध्ये स्थापन केलेल्या हिंदू युवा वाहिनी या संघटनेचे प्रमुखपद सिंह यांनी काही काळ सांभाळले होते.
येथील सपच्या मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात सिंह आणि बसपच्या काही नेत्यांनी त्या पक्षाचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारले. त्यावेळी सपचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि त्या पक्षाचे मार्गदर्शक मुलायमसिंह यादव उपस्थित होते. सिंह आणि इतर नेत्यांचे सपमध्ये स्वागत करताना अखिलेश यांनी उत्तरप्रदेशातील सत्तारूढ भाजपचे दिवस आता भरल्याची प्रतिक्रिया दिली. ते नेते यापुढे भाजपच्या खऱ्या इराद्यांची पोलखोल करतील, असेही त्यांनी म्हटले. सिंह यांचा सप प्रवेश ही उत्तरप्रदेशच्या राजकारणातील महत्वाची घडामोड मानली जात आहे. योगी मुख्यमंत्री बनेपर्यंत त्यांचे सर्वांत निकटवर्तीय म्हणून सिंह यांच्याकडे पाहिले जात होते. योगींचे उत्तरप्रदेशात राजकीय वजन वाढण्यास हिंदू युवा वाहिनीने मोठा हातभार लावला. मात्र, त्या संघटनेतील काही नेत्यांच्या राजकीय आकांक्षा जागृत झाल्या. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी त्या संघटनेतील धुसफूस चव्हाट्यावर आली. संघटनेच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी देण्यास नकार दर्शवला.
त्यामुळे नाराज झालेल्या सिंह यांनी संघटनेचे उमेदवार भाजपच्या विरोधात रिंगणात उतरवण्याचा इशारा दिला. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये बेशिस्तीचा ठपका ठेऊन सिंह यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्या कारवाईमुळे आणखीच नाराज झालेल्या सिंह यांनी हिंदू युवा वाहिनी (भारत) ही नवी संघटना स्थापन केली.