लोणी काळभोर -नागरिकांच्या निष्काळजीपणा तसेच शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे करोनाने पूर्व हवेली तालुक्याच्या पुन्हा हात पाय पसरण्यास सरूवात केली आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी करोनाने हवेलीच्या पूर्व भागातील धुमाकूळ घातला होता. मार्च महिना सुरु होताच बाधित रुग्णांची संख्येने वेग धरल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती हद्दीत करोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतीतील 4 तर आरोग्य केंद्रातील 2 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे त्यांच्या संपर्कातील सर्वांची करोना चाचणी केली. सर्वसामान्य नागरीक मात्र करोना रोखण्यासाठी उदासीन दिसत आहेत.
ग्रामपंचायत, तलाठी, प्राथमिक आरोग्य केंद्र, महावितरण कंपनी आदी ठिकाणी गावातील बऱ्याच नागरिकांचे येणे-जाणे असते. करोना प्रतिबंधक उपाययोजने बाबतचे प्रयत्न येथे तोकडे पडत असल्याचे जाणवत आहे. त्यातच येथील आठवडे बाजार सुरू करण्यात आला आहे. येथे खरेदीदार व विक्रेते विनामास्क आढळून येतात. तसेच सोशल डिसंन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत यामुळे करोना रूग्णसंख्या वाढीची शक्यता नाकारता
येत नाही. लोणी काळभोर हद्दीत 769 जणबाधित झाले आहेत. 733 जण बरे तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर 21 जणांवर उपचार सुरू आहेत. कदमवाकवस्ती हद्दीत 846 जणांना लागण झाली आहे. त्यापैकी 804 जण बरे झाले तर 17 जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांवर उपचार सुरू आहेत. विश्वराज हॉस्पिटल येथे एकूण 1 हजार 922 जणांना लस दिली आहे.
करोना बाधितांची संख्या वाढत आहे ही बाब लक्षात येवूूूूनही त्यांच्या संपर्कात आलेले अनेक जण रासरोजपणे सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत. यापुढील काळात मात्र आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांनी एकत्र येऊन कारवाई करण्याची गरज आहे. करोनाची साखळी तोडल्याशिवाय परिसरातील करोनाची साथ आटोक्यात येणार नाही.
– डॉ. डी. जे. जाधव,आरोग्य अधिकारी लोणी काळभोर