शिरूर -शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे गुरुवार (दि. 18) किंवा शुक्रवार (दि. 19) मार्च पासून कोविड लस उपलब्ध होणार आहे. त्यासाठीची परवानगी आरोग्य खात्याकडून मिळाली आहे, अशी माहिती शिरूर-हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांनी दिली.
आमदार अशोक पवार यांच्या पाठपुराव्यामुळे शिरूर शहरात लसीकरण सुरू होणार असून यामुळे शहरातील वृद्ध, महिला, व नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तालुक्यात याअगोदर प्राथमिक रुग्णालय, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय व काही खासगी रुग्णालयात करोना लस देण्याचे सुरू आहे. काही जणांनी पाहिला तर काही जणांनी दुसरा डोसही पूर्ण केला आहे.
परंतु कोवीड लस शिरूर शहरात सुरू करावी यासाठी शिरूर शहर वकील सेलचे अध्यक्ष ऍड. रवींद्र खांडरे, शिवसेनेचे जिल्हा संघटक कैलास भोसले, कॉंग्रेसचे ऍड. किरण आंबेकर यांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे मागणी केली होती. ही मागणी आमदार पवार यांनी पूर्ण करून शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे करोना लसीकरण 18 किंवा 19 मार्च पासून उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूर ग्रामीण रुग्णालय शेजारी असणारे प्राथमिक रुग्णालयाच्या इमारतीमध्ये शिरूर शहर व पंचक्रोशीतील इतर नागरिकांसाठी करोना लसीकरण सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठीचे काम या इमारतीमध्ये सुरू झाले आहे. त्यानुसार दि. 18 किंवा दि.19 मार्च रोजी या लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
– तुषार पाटील अधीक्षक शिरूर ग्रामीण रुग्णालय