- वायसीएममध्ये नागरिकांची लूट ः पार्किंगचा ठेकेदार करतोय फसवणूक
पिंपरी – संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्ण व नातेवाईकांची गर्दी असते. या ठिकाणी येणाऱ्या नातेवाईकांच्या वाहनांसाठी “पे अँड पार्किंग’ तत्वावर वाहने लावण्यासाठी सोय करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने ऋषी मारठकर या ठेकेदाराला ठेका देण्यात आला आहे. या ठेकेदाराकडून गरीब रुग्णांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. येथे दुचाकी वाहनांसाठी पावतीवरील रक्कमेपेक्षा जादा पैसे घेतले जात असल्याचे समोर आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी पार्किंग क्षेत्र उभारण्यात आले आहेत. महापलिकेच्या भूमि व जिंदगी विभागाने मिळकतीवर आणि काही मोकळ्या जागेवर पार्किंग धोरण राबवून ठेकेदार नियुक्त केले आहेत. महापालिकेच्या भूमि व जिंदगी विभागाकडून शहरातील मिळकतीचे संरक्षण करण्यात येते. तर मोकळ्या आरक्षित जागा भूसंपादन झाल्यानंतर त्या विभागाकडे हस्तांतर करण्यात आलेल्या आहेत. त्यातील महापालिकेच्या शाळा, दवाखाने, रुग्णालये, भाजी मंडई, प्रभागस्तरीय इमारती, नाट्यगृहे या शिवाय मोकळ्या जागेवर पार्किंगचे धोरण राबविले आहे.
त्यानुसार महापालिकेने शहरात 23 ठिकाणी पार्किंगच्या जागा राखीव केल्या आहेत. त्या जागेवर पार्किंग करण्यासाठी ठेकेदार नियुक्त केले आहेत. त्यामध्ये वायसीएम रुग्णालयाचाही समावेश आहे. या ठिकाणी ऋषी मारठकर या ठेकेदाराच्या वतीने ऋषी वाहनतळ या नावाने पार्किंगसाठी वसुली केली जाते.
वायसीएम रुग्णालय हे शहरातील 750 खाटांचे सर्वात मोठे रुग्णालय आहे. रुग्णालयात राज्याच्या काना-कोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात.
दररोज सुमारे सातशे रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. येथे जुन्या पार्किंगच्या ठिकाणी नवीन इमारतीचे काम सुरु आहे. त्यामुळे पार्किंगसाठी जागा अपुरी पडत आहे. असे असतानाही महापालिकेच्या वतीने त्या ठिकाणी पार्किंगसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठेकेदारांकडून जादा पैसे घेतले जातात. दुचाकी वाहनांसाठी पाच रुपये रक्कम ठरविण्यात आली आहे. मात्र या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून सर्रास दहा रुपये घेतले जातात.
रुग्णालयात येणारे नातेवाईक हे घाईगडबडीत असतात. त्यामुळे ते पावतीवर छापलेल्या रक्कमेकडे बघत नाहीत. अथवा बघितले तरी ते कर्मचाऱ्यांशी याबाबत हुज्जत घालणे टाळतात. याचाच फायदा घेत ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची लूट केली जाते. असे असताना यावर प्रशासन मात्र काहीही अंकुश ठेवत नाही. त्यामुळे गोरगरीब जनतेची ठेकेदारांमार्फत लूट सुरु आहे.
वायसीएम रुग्णालयामध्ये नातेवाईक रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. त्यामुळे रुग्णालयाच ये-जा सुरु असते. येथे पार्किंगसाठी जादा पैसे घेतले जात आहेत. पावतीवर पाच रुपये रक्कम छापलेली आहे. मात्र प्रत्यक्षात दहा रुपये घेतले जात आहेत.
– ज्ञानेश्वर जाधव, रुग्णाचे नातेवाईक.ह प्रभागाच्या वतीने त्या ठेकेदारावर नियंत्रण ठेवले जाते. अशा प्रकारे जादा पैशांची लूट केली जात असेल तर त्याची चौकशी केली जाईल. संबंधित ठेकेदाराला पत्रव्यवहार करून सूचना दिल्या जातील.
– जयवंत निरगुडे, मुख्य लिपिक, “ह’ प्रभाग