सातारा -परताव्याचे आश्वासन देऊनही 18 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगलीतील रिचआधार मल्टी ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एसएलपी कंपनीच्या विरोधात म्हसवड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी महादेव सुदाम काटकर (रा. वरकुटे मलवडी, ता. माण) यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनंतर सतीश काका बंडगर (रा. संजयनगर पोलिस ठाण्यामागे, चिंतामणीनगर, सांगली) आणि रिचआधार मल्टी ट्रेडर्सच्या संचालकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, जानेवारी 2021 पासून नोव्हेंबर 2022 पर्यंत हा प्रकार घडला. तक्रारदार तसेच इतर असे मिळून चौघाजणांनी रक्कम भरली होती. याबाबत महिन्याला निश्चितपणे परतावा देण्याचे आश्वासन संबंधितांकडून देण्यात आले होते. मात्र, काही दिवस परतावा देण्यात आला. त्यानंतर परतावा दिला नाही. यामधून 18 लाख 40 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रारीनंतर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत म्हसवड ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक भंडारे हे तपास करीत आहेत.