सातारा – शाळेच्या पहिल्याच दिवशी प्राथमिक व माध्यमिक शाळांनी विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी दिल्या.
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याच्या सूचना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सकाळपासूनच अभूतपूर्व उत्साह जाणवत होता. विद्यार्थ्यांचे ढोल, ताशाच्या निनादात वाजत गाजत स्वागत करुन त्यांना गुलाबपुष्प व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. शहरी भागासह ग्रामीण भागातही शिक्षकांसह पालक व विद्यार्थी या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी विशाल कुमठेकर यांनी जिल्हा परिषद शाळा वासोळे या शाळेस भेट दिली. श्री. खिलारी यांनी वर्गात भेट देऊन विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी धीटपणे उत्तरे दिली. पहिलीच्या मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरणही करण्यात आले. सर्वांना मार्गदर्शन करून शालेय ग्रंथालयासाठी, मुलांच्या अवांतर वाचनाच्या सवयीसाठी, मुख्याध्यापकांकडे पुस्तके आणण्यासाठी श्री. खिलारी यांनी आर्थिक मदत दिली. शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप याप्रमाणे 155 रोपे देण्याचे यावेळी जाहीर केले. मुलांना शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन अभ्यास करण्याविषयी तसेच विविध उपक्रमाविषयी श्री. खिलारी यांनी मार्गदर्शन केले.