न्यूयॉर्क: अमेरिकेतील करोनाचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे न्यूयॉर्क शहर येत्या जून महिन्यापर्यंत बंदच राहणार आहे. त्या शहराच्या महापौरांनी ही माहिती दिली. तथापि न्यूयॉर्क राज्याचे तीन विभाग मात्र येत्या 15 मे पासून सुरू होणार आहेत.
महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार न्यूयॉर्क शहरातील करोनाच्या रुग्ण संख्येत आता घट होताना दिसत आहे. रुग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण कमी होत असून ही प्रगती आणखी वाढण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हे प्रमाण लक्षणीयरित्या घटले तरच न्यूयॉर्क शहर पुन्हा खुले करण्याच्या पर्यायावर विचार करता येऊ शकेल, असे त्यांनी नमूद केले. जून सुरू होण्यापर्यंत याची वाट पहावी लागेल. त्यानंतरच्या स्थितीचा आढावा घेऊनच न्यूयॉर्क शहर पुन्हा सुरू होण्याविषयी काहीं निर्णय घेता येणे शक्य आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान न्यूयॉर्क प्रांताचे गव्हर्नर अँड्य्रु क्योमो यांनी सांगितले की, या प्रांतातील तीन विभाग आम्ही 15 मे पासून खुले करणार आहोत. त्यात टप्प्याटप्याने विविध व्यवसायांना अनुमती दिली जाणार आहे. आवश्यक वस्तुंची सप्लाय चेन आणि वस्तुंच्या उत्पादनाला आमचे प्राधान्य राहील असे त्यांनी सांगितले. जे विभाग खुले केले जाणार आहेत तेथील स्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात येत असून करोना स्थितीचे प्रमाण लक्षात घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार या नियंत्रण कक्षाला असेल असेही त्यांनी सांगितले.