नवी दिल्ली – चीनच्या सीमेजवळ आज चिनी लष्कराची दोन हेलिकॉप्टर आढळल्याने तणाव निर्माण झाला. अलीकडेच लडाखमधील पान्गोंग त्सो तलावाच्या जवळ भारत आणि चीन दोन्हीकडील 250 सैनिकांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. त्यात अनेक सैनिक जखमीही झाले होते. हाणामारीच्या या प्रसंगानंतर भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 विमानांनी या भागात फेऱ्या मारल्या होत्या.
हाणामारीची घटना घडल्यानंतर 6 मे रोजी स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आणि तणाव निवळण्यासाठी नियंत्रण राखण्याबाबत एकमत झाले होते. मात्र अजूनही या भागात तणाव कायम असून दोन्ही बाजूकडे सैन्याच्या तुकड्या आहेत, असे स्थानिक सूत्रांनी सांगितले. सीमा भागात चीनचे हेलिकॉप्टर दिसणे ही काही अनैसर्गिक बाब नाही.
भारताकडूनही लष्करी हेलिकॉप्टरचा वापर केला जात असतो. चीनी हेलिकॉप्टरने भारतीय हवाई हद्दीचा भंग केलेला नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.