नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांच्या कार्याची प्रशंसा केली. संपूर्ण जगाला निरोगी ठेवण्यासाठी परिचारिकांचा सेवाभाव अभूतपूर्व स्वरूपाचा आहे. सेवाभावी वृत्तीने अविरत कार्य करणाऱ्या परिचारिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन हा विशेष दिवस आहे. आजघडीला करोना संकटावर मात करण्यासाठी परिचारिका महान कार्य करत आहेत. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आम्ही आभार मानतो.
परिचारिकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही आम्ही पुन्हा देऊ इच्छितो. सेवाभावाने कार्यरत राहणाऱ्यांची उणीव भासू नये यासाठी संबंधित क्षेत्रातील संधींकडे आम्ही अधिक लक्ष देऊ, अशी भावना मोदींनी ट्विटरवरून व्यक्त केली. आधुनिक नर्सिंगच्या जननी मानल्या जाणाऱ्या फ्लोरेंस नाइटिंगेल यांच्या जयंतीदिनी (12 मे) आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो.