- आयुक्त हर्डीकर ः व्यक्ती, संस्थांनी सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणी करु नये
- “चमकोगिरी’साठी काही नगरसेवकांकडून केली जात आहे फवारणी
पिंपरी – सार्वजनिक ठिकाणी नागरिक, खासगी संस्था आणि नगरसेवकांकडून स्वेच्छेने करण्यात येणारी औषध फवारणी ही बेकायदेशीर आहे. कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी फवारणी करण्यास परवानगी दिलेली नाही, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज स्पष्ट केले.
शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणून काही नागरिकांकडून, खासगी संस्थांकडून तसेच नगरसेवकांकडून त्यांच्या परिसरात मनानेच औषध फवारणी केली जात आहे. या निमित्ताने संबंधितांनी “चमकोगिरी’ सुरू केली आहे. दरम्यान, आयुक्तांनीच अशा प्रकारच्या औषध फवारणीला प्रतिबंध केल्याने आता या चमकोगिरीला आळा बसणार आहे.
आयुक्त हर्डीकर यांनी याबाबत स्पष्ट केले आहे की, करोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने औषध फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून औषध फवारणी करण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी प्राधान्याने औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच, आरोग्य विभागाकडून करण्यात येणारी औषध फवारणी ही शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येत असल्याने त्यासाठी कोणत्याही सूचना अथवा मार्गदर्शन कर्मचाऱ्यांना करू नये. सबब कोणत्याही नागरिक, खासगी संस्था अथवा नगरसेवकांनी सार्वजनिक परिसरामध्ये औषध फवारणीची कार्यवाही करू नये.