वडगाव मावळ – पोलीस पाटील पदासाठी खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले व पक्षाच्या चिन्हाचा वापर केल्याने चांदखेडचे पोलीस पाटील दत्तात्रय माळी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिले.
या संदर्भात अमोल कांबळे, पांडुरंग कदम, प्रशांत होगले, पौरस बारमुख यांनी न्यायालयात माळी यांच्या विरोधात फसवणुकीचा दावा दाखल केला होता. प्रथमवर्ग न्यायाधीश टी. एम. निराले यांनी यावर सुनावणी करताना माळी यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
माळी यांनी पोलीस पाटील पदासाठी अर्ज करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण कुठल्याही राजकीय पक्षासोबत नसल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र दोन महिन्यांनी त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला.
त्यानंतर 27 ऑक्टोबर 2017 रोजी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हाचाही वापर केला असून, उपविभागीय अधिकारी यांनी 1 मार्च 2018 रोजी त्यांची चांदखेडच्या पोलीस पाटील पदावर नियुक्ती केली. त्यामुळे तक्रारदारांनी माळी यांच्याविरोधात प्रथम पोलिसांकडे तक्रार केली; परंतु कारवाई न झाल्यामुळे न्यायालयात दावा दाखल केला होता.
दरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे पोलीस पाटील वर्गात चांगलीच खळबळ उडाली.