नवी दिल्ली : सोनिया गांधी यांचे वडील हिटलरच्या लष्करात होते, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सांबित पात्रा यांनी कॉंग्रेसवर पलटवार केला. आदनान सामी यांना पद्मश्री देण्यावरून सुरू असलेल्या वादात त्यांनी आक्रमकपणे कॉंग्रेसवर कोरडे ओढले. त्यांनी सोनिया गांधी यांना राष्ट्रीय नागरीकत्व देण्याच्या कॉंग्रेसच्या काळात झालेल्या निर्णयावरही शंका उपस्थित केल्या.
सामीला पद्मश्री दिल्याबद्दल कॉंग्रेसने टीका केली. पाकिस्तानी एअर फोर्सच्या चालकाच्या मुलाला हा सर्वोच्च नागरी पुरस्कार का दिला? असा सवाल कॉंग्रेसने उपस्थित केला होता.
एनआरसी नंतर कारगिलमधील योध्दा आणि भारतीय लष्कराचा निवृत्त अधिकारी महंमद सनाउल्लाह यांना परदेशी ठरवण्यात आले. तर भारताविरूध्द लढणाऱ्याच्या कुटुंबातून आलेल्या अदनान सामीला पद्मश्री दिली जाते. ही एनआरसी आणि सरकारी चमचेगिरीची कमाल आहे! असे कॉंग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल सोमावारी सकाळी म्हणाले होते.
दरम्यान, कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी आश्चर्यकारकरित्या सामीला पद्मश्री दिल्याबद्दल अभिनंदन केले आहे.