- सार्वजनिक बंदचे केले आवाहन
कामशेत – कामशेत शहरामध्ये दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कामशेतमध्ये कडकडीत बंद पाळला पाहिजे, अशी भावना सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. असे असताना करोना रुग्णांकडून दुकाने उघडी ठेवण्याचा प्रताप होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. व्यापाऱ्यांवर प्रशासनाचा अंकुश न राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांनी बंद पुकारला आहे.
कामशेत शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणारे रुग्ण लक्षात घेता सुजाण नागरिक व व्यापारी असोसिएशन यांनी ग्रामपंचायतमध्ये बैठक घेत शनिवार (दि. 5) ते गुरुवार (दि. 10) असा 6 दिवस स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे.
कामशेत शहरामध्ये आजपर्यंत सुमारे 150 नागरिकांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर कामशेतमधील 9 नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती कामशेत आरोग्य केंद्रातील आर. सी. राऊत यांनी दिली. यामुळेच कामशेत शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असल्याने नागरिकांनी या बंदला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विलास भटेवरा यांनी केले आहे.
या बंदच्या काळात दूध, मेडिकल, खते व पशुखाद्य विक्री करणारी दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. यामध्ये भाजीपाला दुकाने उघडी ठेवणे आवश्यक असतानाही यावर या बैठकीत निर्णय झाला नाही.
करोना रुग्णांनी उघडली दुकाने
शहरातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दुकाने उघडली आहेत. त्यामुळे कामशेत शहराबरोबरच ग्रामीण भागातदेखील करोनाची रुग्णसंख्या वाढण्यास मदत होणार आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांना विचारणा केली असता करोना पॉझिटिव्ह व्यापाऱ्यांची दुकाने तातडीने बंद केली असून, त्यांच्यावर कारवाई करणार आहोत तसेच या बंदला पोलिसांकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.
हा बंद कोणावरही लादता येणार नाही. बंद स्वयंस्फूर्तीने पाळण्यात येत असल्याने कोणावर कारवाई करण्यात येणार नाही. याकाळात सर्वसामान्य नागरिकांवर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता प्रशासन घेईल.
– संदेश शिर्के, प्रांताधिकारी, मावळ