नवी दिल्ली – गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयांची परतफेड करू न शकल्याच्या आरोपांमुळे 26 महिने तुरूंगात काढावे लागलेले सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सहारा परिवाराच्या तीन कोऑपरेटिव्ह सोसायट्यांमधील अनियमिततेचा मुद्दा आता उपस्थित झाला आहे.
एका राष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार या सोसायट्यांमध्ये तब्बल चार कोटी गुंतवणूकदारांनी 86,673 कोटी रुपये जमा केले असून आता या संस्थांच्या तपासणीचा निर्णय सरकारने घेतला आहे.
गंतवणूकदारांनी 2012 ते 2014 या काळात ही गंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक आता धोक्यात आली असल्याचा दावाही केला जातो आहे. सुब्रत रॉय यांना अटक झाल्यानंतर आणि त्यांच्या समुहातील दोन कंपन्यांवर सर्वोच्च न्यायालयाने ठपका ठेवल्यानंतर या तीन कोऑपरेटिव्ह संस्था स्थापन केल्या होत्या. या तीन व अगोदरची एक अशा चार संस्थांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करण्यात आले होते.
हा सर्व प्रकार रडारवर आला असून जमा करण्यात आलेल्या या रकमेपैकी 62 हजार 643 कोटी रुपये लोणावळ्या जवळील ऍम्बी व्हॅली प्रोजेक्टमध्ये गंतवण्यात आल्याचा आरोप आहे. कृषि मंत्रालयाचे सह सचिव आणि कोऑपरेटिव्ह सोसायटींचे रजिस्ट्रार विवेक आग्रवाल यांनी 18 ऑगस्ट रोजी पत्र लिहून या गंभीर अनियमिततेची चौकशी सुर केली जाण्याची मागणी कॉर्पोरेट मंत्रालयाकडे केली असल्याचे संबंधित बातमीत म्हटले आहे.
गेल्या आठ वर्षांच्या काळात सुब्रत रॉय यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. या काळात त्यांच्या समूहाचा दबदबा बऱ्यापैकी कमी झाला असला तरी आपल्या समुहाच्या कर्मचाऱ्यांमध्ये सहारा श्री या नावाने ते चर्चेत असतात. बड्या राजकीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध, त्यांच्या खासगी कार्यक्रमांना बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी लावलेली हजेरी आणि एकूणच त्यांची अलिशान जिवनशैली यामुळे ते काही काळापूर्वी सतत प्रकाशझोतात असायचे.
तब्बल दोन दशके हा समूह भारतीय क्रिकेट संघाचा प्रायोजक होता व तेव्हा समूहाची एकूण संपत्ती 11 अब्ज डॉलरच्या पुढे गेल्याची वदंता होती. वित्त, गृहनिर्माण, उत्पादन, मीडियासह हवाई वाहतूक क्षेत्रातही या समूहाने शिरकाव केला होता. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही रॉय यांची प्रचंड मालमत्ता आहे.
बीबीसीच्या 2014 च्या एका बातमीनुसार न्यूयॉर्कच्या प्लाझा हॉटेल आणि लंडनच्या ग्रॉसवेनर हाउसवरही त्यांची मालकी होती. भारतीय हॉकी संघाचे प्रायोजक ते फॉर्म्युला वन रेसिंग टीमचे मालक असा सर्वत्र या समूहाचा संचार होता.