प्रियांका गांधी राहणार उपस्थित
नवी दिल्ली : राजकीयदृष्ट्या देशातील सर्वांत महत्वाचे राज्य असणाऱ्या उत्तरप्रदेशात पुन्हा भक्कम बस्तान बसवण्यासाठी कॉंग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. त्या राज्यातील गमावलेला जनाधार पुन्हा कमावण्याच्या उद्देशातून पक्ष रणनीती आखणार आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी तीन दिवसीय कार्यकाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्तरप्रदेश कॉंग्रेसने कार्यशाळेचे ठिकाण म्हणून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाची निवड केली आहे. त्या कार्यशाळेला पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उपस्थित राहणार आहेत. कॉंग्रेसने उत्तरप्रदेशसाठी नुकतीच नवी टीम जाहीर केली. त्या टीमने कार्यशाळेच्या माध्यमातून प्रथमच महत्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यशाळेत प्रदेश कॉंग्रेसच्या नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना पक्ष बळकट करण्यासाठी त्यांच्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. त्या राज्यातील सत्तारूढ भाजप आणि सरकारशी दोन हात करण्यासाठी रणनीती आखली जाईल. त्याशिवाय, सामान्य जनतेपर्यंत पोहचण्यासाठी राजकीय धोरण निश्चित केले जाईल.
उत्तरप्रदेशात मागील काही वर्षांपासून कॉंग्रेस पक्ष पिछाडीवर पडला आहे. त्या राज्यात मागील लोकसभा निवडणुकीपासून भाजपने मोठा दबदबा निर्माण केला आहे. त्याशिवाय, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचीही मोठी ताकद आहे. त्या तीन पक्षांच्या राजवटींमुळे कॉंग्रेसला अनेक वर्षांपासून उत्तरप्रदेशच्या सत्तेपासून दूर राहावे लागले आहे.